सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची ६२० एकर जमीन बळकावल्याप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या दोन नातेवाईकांना नोटीस काढली आहे. याप्रकरणाची सुनावणी दि. ११ जून रोजी होणार असून सुनावणीला गैरहजर राहिल्यास अथवा कागदपत्रे सादर न केल्यास जमीन धारणेची कमाल मर्यादपेक्षा जास्त धारण केलेली जमीन सरकारजमा केली जाईल, असंही नोटीसीत म्हटलं आहे.
साताऱ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडाणी गावातील जमीन घोटाळा उघडकीस आणला आहे. सह्याद्री वाचवा या मोहिमेतंर्गत झाडाणी येथील ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावली. तसेच अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचे माहिती अधिकाराच्या कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले. याप्रकरणी जीएसटी आयुक्तांसह १३ जणांच्या नावे जमिनीची खरेदी झाल्याचे समोर आले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसा काढल्या आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून वाईच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सुट्टीवर आपल्या दरे गावी आलेल्या मुख्यमंत्र्यांनीही संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्याऱ्यांना दिले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांना नोटीस काढली असून दि. ११ जून रोजी सुनावणी होणार आहे.