महाबळेश्वरातील जमीन घोटाळ्यात आणखी 8 जणांना नोटीसा, जिल्हाधिकाऱ्यांसमोर गुरूवारी सुनावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील जमीन घोटाळ्या प्रकरणी अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्या आठ नातेवाईकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. त्यांना गुरुवारी (दि. २० जून) होणाऱ्या सुनावणीला हजर राहावे लागणार आहे.

सध्या राज्यात महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी जमीन घोटाळ्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. यापूर्वी तीन जणांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसा बजावल्या होत्या. आता आणखी आठ जणांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसा बजावल्या असून याप्रकरणी गुरूवारी होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्यास नोटीसीद्वारे कळविले आहे.

जीएसटी आयुक्तांच्या अडचणी वाढल्या

अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावे झाडाणी गावची संपूर्ण जमीन खरेदी केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली. माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या उपोषणानंतर 40 एकरावरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आता जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी 8 जणांना नोटीसा काढल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांसमोर गुरूवारी पुन्हा सुनावणी

जमीन धारणेच्या कमाल मर्यादापेक्षा जास्त जमीन धारण केल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोंगीरवार यांना नोटीस काढली होती. ११ जून रोजी त्यांच्या वकीलांनी हजर होऊन पुरावे सादर करण्यास मुदत मागितली. जिल्हाधिकाऱ्यांनी २० जून रोजी सुनावणी ठेवली आहे.या प्रकरणाचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी आठ जणांना नोटीसा काढल्या आहेत.

वळवी कुटुंबीयांसह नातेवाईकांना बजावली नोटीस

जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांच्या नंतर आता त्यांचे नातेवाईक रत्नप्रभा अनिल वसावे, दीपेश अनिल वसावे, संगीता चंद्रकांत वळवी, अरुणा बोंडाळ, गौतम मोहन खांबदकोन, आरमान चंद्रकांत वळवी, आदित्य चंद्रकांत वळवी, दीपाली दिलीप मुक्कावार यांनाही नोटीसा काढण्यात आल्या आहेत. आवश्यक ती कागदपत्रे आणि लेखी म्हणणे घेऊन गुरूवारी (दि.20 जून) उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.