कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात असलेल्या पालिकांकडून शहरातील व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी भाडेतत्वावर ठराविक करारावर जागा, गाळे दिले जातात. मात्र, त्या जागांवर अतिक्रमण करण्याचे प्रकार काही व्यवसायिक करीत असतात.असाच प्रकार पाचगणी या ठिकाणी घडला आहे. येथील व्यावसायिकांनी पालिकेच्या मंजूर करण्यात आलेल्या गाळ्या व्यतिरिक्त अतिरिक्त बांधकाम, पत्रा शेड बांधण्यात आले आहे. अशा व्यवसायिकांवर पालकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधितांना नोटिसा देत सात दिवसांच्या आतमध्ये अतिक्रमण काढून घ्यावे, अशा सूचना दिल्या आहेत.
पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिलेल्या नोटिसात म्हंटले आहे की, पालिकेच्या मालकीच्या शॉपिंग सेंटरमध्ये गाळा मंजूर असून त्याचे क्षेत्रफळ मोजून जे गाळे पालिकेने गाळाधारकांना त्यांच्या ताब्यात दिले आहेत. त्यावेळी गाळ्याची जशी स्थिती होती. तशीच स्थिती आज ठेवणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. देऊ केलेल्या गाळ्याच्या चतुःसीमामध्ये बदल करणे किंवा पोट भाडेकरू ठेऊन उत्पन्न कमावणे अभिप्रेत नाही. या गाळ्यामध्ये नगरपरिषदेच्या पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही स्वरूपाचे अंतर्गत बदल किंवा गाळ्याशी संलग्न पुढच्या अथवा मागच्या बाजूस तसेच गाळ्याच्या दर्शनी भागात पत्रा शेड उभारणे बेकायदेशीर आहे.
तसे केले असल्यास संबंधितांनी स्वतःहून ७ दिवसांचे आत काढून घ्यावे, अन्यथा दिलेली मुदत संपल्यावर नगरपरिषद काढून घेईल. तसेच संबंधित खर्चाची वसुली गाळे धारकाकडून केली जाईल. तसेच पालिकेच्या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित व्यवसायिकांवर महाराष्ट्र नगरपरिषद् नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशा सुचना मुख्याधिकाऱ्यानी नोटिसीद्वारे दिलेल्या आहेत.