कराड प्रतिनिधी | सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 234 जणांनी 251 उमेदवारी अर्ज दाखल केले. तर 17 जणांनी दुबार अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीवकुमार सुद्रिक यांनी दिली.
अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी 157 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये गट क्रमांक एक कराड मधून 14 अर्ज, गट क्रमांक दोन तळबीडसाठी 32, गट क्रमांक तीन उंब्रजसाठी 30, गट क्रमांक चार कोपर्डे हवेलीमधून 46, गट क्रमांक पाच मसूरमधून 40, गट क्रमांक सहा वाठार (किरोली) मधून 28, महिला राखीव गटातून 14, अनुसूचित जाती/जमाती राखीव साठी 9, इतर मागास प्रवर्ग राखीव गटातून 11 तर वि.जा. भ. ज., विशेष मागास प्रवर्ग गटातून 10 जणांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, येथील छत्रपती संभाजी महाराज मार्केट येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आज गुरुवारी दाखल अर्जांची छाननी होणार आहे. यासाठी उमेदवार व त्यांनी रीतसर परवानगी घेऊन नेमलेल्या प्रतिनिधीना ओळखपत्रासह छाननी प्रक्रियेत प्रवेश दिला जाईल. याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीवकुमार सुद्रिक यांनी दिली.