सातारा प्रतिनिधी । वाई विधानसभा मतदार संघात यावेळेस तिरंगी लढत पहायला मिळांनार आहे. कारण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून मकरंद पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी महाविकास आघाडीकडून सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ यांनी देखील उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. मात्र, दोघांच्या नंतर अपक्ष म्हणून पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांनी देखील आपला अर्ज दाखल केला आहे.
महायुती आणि महाआघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये पक्षांचे विभाजन झाल्यामुळे एकमेकांसोबत असलेले नेते आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. काल वाईमधून माजी मंत्री स्व. मदन आप्पा पिसाळ यांच्या स्नुषा व माजी जि. प. अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांच्या नावावर पक्षातर्फे शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. तर त्यांच्यानंतर वाई विधानसभा मतदार संघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून मकरंद पाटील हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती, कट्टर शिवसैनिक पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पदाचा व शिवसेना सदस्यत्वाचा नुकताच वर्षा निवासस्थानी जाऊन राजीनामा दिला. वाई -खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून रणांगणात उतरणार असल्याचा इशारा पुरुषोत्तम जाधव यांनी दिला होता. त्यानंतर आज जाधाव यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.