आवडीच्या गाडीच्या नंबरसाठी नको RTO कार्यालयाची चक्कर; आता घरबसल्या मिळणार VIP नंबर !

0
1

सातारा प्रतिनिधी । नवीन दुचाकी, चारचाकी किंवा अन्य कोणतीही गाडी खरेदी केल्यानंतर प्रत्येकाला गाडीवर सहज ओळखता येणारा किंवा ‘लकी नंबर’, ‘चॉइस नंबर’ हवा असतो. त्यासाठी आतापर्यंत आरटीओ ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या. परंतु आता घरातून ऑनलाइन आवडता क्रमांक मिळविता येणार आहे. संपूर्ण राज्यात दि. २५ नोव्हेंबरपासून ही सुविधा सुरू झाली आहे. दरम्यान, साताऱ्यात २ महिन्यांमध्ये आरटीओ कार्यालयांमध्ये चॉइस क्रमांकाची विक्री वाढली असून, त्याच्या माध्यमातून आरटीओला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

नवीन गाडी घेतल्यानंतर बरेच जण बेरीज नऊ, सात किंवा इतर येते काय, याची तपासणी करतात. काहीजणांना वाहनावरील क्रमांकाची बेरीज त्यांच्या त्यांच्या मनासारखी हवी असते. काहीजणांना जुन्या गाडीचा नंबर नवीन गाडीवर हवा असतो. काहींना ‘लकी नंबर’ हवा असतो. तर बरेच जण ‘व्हीआयपी’ क्रमांक मिळविण्यासाठी धडपडत असतात.

गाडीवर आवडीचा क्रमांक झळकला जावा यासाठी आतापर्यंत आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन चकरा माराव्या लागत. मात्र, आता वाहनधारकांना आवडीचा क्रमांक मिळविण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे चकरा माराव्या लागणार नाहीत. आवडीचा क्रमांक निवडण्यासाठी राज्यात दि. २५ पासून ऑनलाइन सुविधा निर्माण केली आहे.

सात महिन्यांत 4 कोटी महसूल

फॅन्सी नंबर तसेच आपल्या आवडते नंबर घेण्यासाठी सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या सात महिन्यांत अनेकांनी अर्ज केले. आपल्या पसंतीचे ४ हजार ७९२ नंबर वाहन चालकांनी खरेदी केले. त्यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला तब्बल ४ कोटी ४४ लाख २८ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून आपल्या वाहनाला आवडता नंबर घेण्यासाठी एकप्रकारची चुरस साताऱ्यात पाहायला मिळत आहे.

दलालांचा पत्ता कट होणार

आपल्या दुचाकी किंवा चारचाकी गाडीला फॅन्सी नंबरसाठी काही दलाल तत्पर असतात. त्यांना विनाकारण पैसे मोजावे लागतात. पण आता ऑनलाईन सुविधेमुळे दलालांची आवश्यकता भासणार नाही.

या’ प्रकारच्या नंबर्ससाठी जास्त आटापिटा

गाडीवर १, ९, ९९, ९९९, ९९९९ तसेच तीन अंकी १ ते ८. चारअंकी १ ते ८ या क्रमांकाबरोबर १०, ११, २२ तसेच १००, चढत्या क्रमांचे नंबर आदी क्रमांक गाडीवर टाकण्यासाठी अनेकजण आटापिटा करतात.

दुचाकी अन् चारचाकीचा नंबर हवाय सेम-सेम!

दुचाकी असेल आणि नवीन चारचाकी घेतली तर बऱ्याचजणांना दुचाकीचा नंबर चारचाकीला हवा असतो. काहीजण त्यांच्या गाडीच्या क्रमांकावरूनही ओळखले जातात. त्यासाठी सेम नंबर घेण्याकडे कल दिसतो.

सॉफ्टवेअर बनणार; नंबर ऑनलाइन मिळणार

फॅन्सी डॉट परिवहन या संकेतस्थळावर जाऊन मोबाइल आणि ई-मेलच्या माध्यमातून ‘ओटीपी’ मिळवून नोंदणी करावा लागणार आहे. त्यानंतर उपलब्ध असलेल्या आवडीच्या क्रमांकामधून तुम्हाला हवा असलेला क्रमांक निश्चित करावा लागेल. त्याचे पैसे ऑनलाइन पेमेंट गेट वेच्या मदतीने भरून ई- पावतीची प्रिंट काढून वाहन विक्रेत्याकडे सादर करावा लागणार आहे.