कराड प्रतिनिधी | सह्याद्री सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूकी संदर्भात दाखल केलेल्या अर्जांपैकी २९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले होते. यातील मानसिंगराव जगदाळे व निवास थोरात यांच्यासह १० उमेदवारांच्या अपील अर्जावर गुरुवारी प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग यांचे समोर सुनावणी पार पडली. या सुनावणीस जगदाळे आणि श्री. थोरात या दोघांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी निकाल राखून ठेवला आहे. याबाबत लवकर निर्णय दिला जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली असल्याची प्रतिक्रिया अर्जदार निवास थोरात यांनी ’हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
गुरुवारी दुपारी एक वाजता पुण्यात साखर आयुक्तालयात प्रादेशीक साखर सहसंचालक निलीमा गायकवाड यांच्या समोर संबंधित दोन्ही अपिलार्थी यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. त्यांचा युक्तिवाद वेळी अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवारांच्या वकिलांच्या बाजू ऐकून घेतली. त्यानंतर उमेदवारांच्या अपिलाबाबत लवकरच निर्णय कळवू असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, झालेल्या सुनावणीनंतर अधिकारी नेमका काय निर्णय जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होतें.
दरम्यान, सुनावणीसाटी १. बाबुराव जगन्नाथ पवार, बेलवडे- हवेली (गट क्रमांक २-तळबीड), २. दिलीप हनुमंत कुंभार, तळबीड (इतर मागास वर्ग राखीव), ३. सिंधुताई दादासो जाधव, पाडळी- हेळगाव (महिला राखीव), ४. जयश्री पृथ्वीराज पाटील, सुपने (महिला राखीव), ५. अधीकराव पांडुरंग माळी, सुपने (इतर मागास वर्ग राखीव), ६. संदीप यशवंत पाटील, उत्तर तांबवे (गट क्रमांक १-कराड), ७. श्रीकांत माधवराव जाधव, गोवारे ( गट क्रमांक ४-कोपर्डे हवेली), ८. प्रतापराव गणपतराव यादव, कडेपूर- कडेगाव (गट क्रमांक १-कराड), ९. मानसिंगराव वसंतराव जगदाळे, मसूर (गट क्रमांक ५-मसूर), १०. निवास आत्माराम थोरात, नडसी( गट क्रमांक ४-कोपर्डे हवेली) यांच्या मार्फत त्यांच्या वकिलांनी उपस्थिती लावली होती.
पुण्यात पार पडलेल्या सुनावणीवेळी आम्ही वकिलामार्फत आमची बाजू मांडली आहे. अधिकाऱ्यांनी आमच्या निर्णयाचा निकाल राखून ठेवला आहे. याबाबत लवकरच निर्णय दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची प्रतिक्रिया निवास थोरात यांनी ’हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल २५१ उमेदवारी अर्जांची छाननी निवडणुक निर्णय अधिकारी सुद्रीक, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक राहूल देशमुख, सहाय्यक निबंधक (प्रशासन) संजय जाधव यांच्या उपस्थितीत झाली.
दाखल २५१ उमेदवारी अर्जापैकी २०५ उमेदवारांचे २१८ अर्ज वैध ठरले आणि २९ उमेदवारांचे ३३ अर्ज अवैध ठरले. उमेदवार अर्जांची छाननी सुरु असताना मुरलीधर गायकवाड यांनी निवास थोरात यांच्या अर्जावर तर वसंतराव जगदाळे यांनी मानसिंगराव जगदाळे यांच्या अर्जावर हरकत घेतली. त्याची सुनावनी निवडणुक निर्णय अधिकारी श्री. सुद्रीक यांच्यासमोर झाली. त्यामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी यांनी श्री. थोरात व श्री. जगदाळे यांचे दोन्ही अर्ज बाद झाल्याचा निकाल दिला. त्यानंतर संबंधित दोघांनीही निवडणुक निर्णय़ अधिकारी यांच्या निकालावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १५२ अ अन्वये प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग यांच्याकडे अपील दाखल केले. त्याची सुनावनी गुरुवारी साखर आयुक्तालयात प्रादेशीक साखर सहसंचालक निलीमा गायकवाड यांच्या समोर झाली.