कराड प्रतिनिधी | सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून काहींनी जाणीवपूर्वक माझा अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न केले. यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केल्यानंतर सहकार आयुक्तांकडे दाद मागितली. त्यात त्यांनी अर्ज वैध ठरवला; परंतु त्यानंतरही त्यावर हरकत घेतल्याने याबाबत न्यायालयाकडे दाद मागितली. या प्रक्रियेत माझा उमेदवारी अर्ज वैध किंवा अवैध ठरला तरीही ही निवडणूक जोमाने लढवून विजय खेचून आणणार आणि सह्याद्रीच्या निवडणुकीत परिवर्तन नक्की होणार असा विश्वास स्व. यशवंतराव चव्हाण चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे प्रमुख निवास थोरात यांनी व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर निवास थोरात यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपचे कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ आदी उपस्थित होते. यावेळी निवास थोरात म्हणाले की, माझ्या उमेदवारी अर्जाबाबत न्यायालयाचा निकाल आला असला तरी आता मागे हटणार नाही. धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ व यांच्या साथीने ही प्रचार करून कोणत्याही परिस्थितीत पॅनेल निवडून आणणारच आहोत.
सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजयश्री खेचून आणणार आहे. येत्या दोन दिवसांत कारखाना कार्यक्षेत्रात जोमाने प्रचार करून मतदारांसमोर सर्व हकिगत मांडणार आहे. कारखान्याच्या सभासद, शेतकरी सुज्ञ आहेत.” त्यामुळे ते कोणत्याही दबावाला बळी न पडत नाहीत. ते प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी निवास थोरात यांनी व्यक्त केला.