सातारा प्रतिनिधी । बाल लैंगिक अत्याचाराविषयी आश्रमशाळांमध्ये जाणीव जागृती होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा चे आयुक्त नितीन उबाळे यांनी केले.
सुवर्धिनी फाऊंडेशन, सातारा व इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी नुकतीच पोक्सो कायदा जागृती व प्रशिक्षण कार्यशाळा या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्रशिक्षणार्थींना नितीन उबाळे यांनी संबोधित केले. आश्रमशाळातील बालके आपलीच मुले आहेत, असे समजून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचे आवाहन नितीन उबाळे यांनी केले.
पोक्सो कायदा प्रशिक्षण कार्यशाळेत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ (पोक्सो कायदा) मधील कायदेशीर तरतुदींविषयीची माहिती अॅड. डॉ. सुचित्रा घोगरे-काटकर यांनी दिली. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारे सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यापासून बालकांचे संरक्षण, समाज माध्यमांचा सुरक्षित वापर या विषयावर सायबर सुरक्षा तज्ञ इंजी. वैशाली मंडपे यांनी मार्गदर्शन केले. तसेच पिडीत व्यक्तींवर लैंगिक अत्याचाराचे परिणाम, लैंगिक अत्याचारग्रस्त बालक कसे ओळखावे या विषयावर डॉ. धनश्री पाटील यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळा के.बी.पी. इंजिनिअरिंग महाविद्यालच्या सभागृहात पार पडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार सुवर्धीनीच्या संचालिका शुभांगी दळवी यांनी केले. या कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे अधिकारी सुनील कर्चे, सुवर्धिनी फाऊंडेशन च्या संचालिका डॉ. शुभांगी काटकर, शुभांगी दळवी, प्रवीण काटकर, अॅड. भाग्यश्री बोकेफोडे, गीतेश ओंबाळे, तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळांमधील दोनशेहून अधिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.