सोशल मीडियावर झळकले अजितदादा गटाचे नितीन पाटलांचे बॅनर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाला मिळाल्याची चर्चा साताऱ्यात सुरू झाली आहे. तसेच भावी खासदार म्हणून लोकसभेसाठी अजितदादा गटातून इच्छुक असलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचे भावी खासदार म्हणून बॅनरही सोशल मीडियावर झळकू लागले आहेत.

अजितदादा गटाला जागा मिळाल्याची चर्चा

सातारा लोकसभेची जागा महायुतीत कोणत्या पक्षाला मिळणार, याची अनेक दिवसांपासून उत्सुकता आहे. भाजपकडून सातारा लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाने देखील या जागेवर हक्क सांगितल्यापासून राजकीय ट्विस्ट निर्माण झाला. आता ही जागा अजितदादा गटाला मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अजितदादांनी जाहिररित्या केला होता दावा

साताऱ्याचे माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचे सुपुत्र आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील हे अजितदादा गटातून इच्छूक आहेत. मागील वेळी खासदार श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे सातारची लोकसभेची जागा आता राष्ट्रवादीच लढेल, असं जाहीर वक्तव्य अजितदादांनी केलं होतं. तेव्हापासून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. आता ही जागा अजितदादा गटाला मिळाल्याची चर्चा झाली आहे. तसेच भावी खासदार म्हणून नितीन पाटील यांचे बॅनर्स सोशल मीडियावर झळकू लागले आहेत.