कोण कुणाशी कधी लग्न करतं अन् कधी घटस्फोट घेतं…; पक्ष फोडाफोडीवर गडकरींच वक्तव्य अन् सारवासारव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी येथे महायुतीच्यावतीने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेस भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पक्ष फोडाफोडीवर सडेतोड मत मांडलं. मात्र, लगेचच त्यांनी सारसारव करण्याचा प्रयत्न केला.

प्रचारसभेत मंत्री गडकरी म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात अमेरिकन संस्कृती आहे. कोण कुणाशी कधी लग्न करतं, कोण कुणाशी कधी घटस्फोट घेतं, कोण कुठल्या पार्टीत येतं आणि कोण कुठल्या पार्टीत जातं, हेच समजत नाही, असे वक्तव्य गडकरी यांनी केले.

मात्र, विद्यमान परिस्थितीबद्दल बोलत असल्याचे गडकरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःला सावरले आणि मी महाराष्ट्र सरकारमध्ये होतो, त्यावेळची पण अशीच परिस्थिती होती, असे सांगत आपल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु, गडकरींचे वक्तव्य हे महाराष्ट्रातील विद्यमान घडामोडींवरच होतं, हे उपस्थितांच्या चांगलंच लक्षात आले.

काँग्रेसवर केली टीका

काँग्रेसचं ६० वर्षे राज्य होतं. त्या काळात बैलजोडी, गाय वासरू, हाताचा पंजा, ही काँग्रेसची चिन्हं होती. त्यावर लोकांनी धडाधड शिक्के मारले. मग कधी रेड्डी काँग्रेस, चड्डी काँग्रेस, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस झाली. किती काँग्रेस झाल्या मला माहिती नाही. सगळ्या काँग्रेस इकडेच झाल्या, अशी उदाहरणे देत गडकरी म्हणाले, आपली बैलाची जोडी फार हुशार आहे. हिरवं दिसलं की घुसते. कुणाला इंजिनिअरिंग कॉलेज, कुणाला मेडिकल कॉलेज, बीएड, डीएड कॉलेज, कुणाला प्राथमिक शाळा. ‘शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही आणि गावोगावी काँग्रेसवाल्यांची रोजगार हमी’, तुमच्याकडे असलं दुकान असल्याची टीका गडकरींनी काँग्रेसवर केली.