कराड : विंग (ता. कराड) येथील नवविवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. निलम अनिकेत माने (वय 21, रा. विंग, ता. कराड) असे मयत नवविवाहीतेचे नाव आहे. तर ही घटना पाहुन सासूने दोन्ही हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. राणी आंकुश माने (वय- 34 ) असे जखमी सासूचे नाव आहे. मयत निलम माने यांच्या संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत सासरच्या दारात अंत्यविधी करण्याची मागणी केल्याने तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण झाले होते. तालुका पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील निलम हिचे तीन महिन्यापुर्वी अनिकेत माने याच्याशी लग्न झाले होते. रविवारी सकाळी निलम माने ही स्वयंपाक घरात झोपली होती. तर पती अनिकेत अंकुश माने, सासू राणी माने व सासरा अंकुश श्रीपती माने (वय- 47 ) हे सर्व जण बाहेर झोपले होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निलम दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, निलमने पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. हि घटना पाहुन सासूने दोन्ही हाताच्या नसा कापून आमहत्त्येचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सौ वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयत निलम माने हिचे आई, वडील, भाऊ व संतप्त नातेवाईकांनी तालुका पोलिस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. निलमच्या मृतदेहावर तीच्या सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस अधिक तपास करीत आहेत.