नवनियुक्त ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कोरेगावामध्ये घेतली मतदानाची शपथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती पथकाद्वारे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरेगाव पंचायत समिती कार्यालयांतर्गत नव्यानेच हजर झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मतदानाची शपथ घेतली. यशेंद्र क्षीरसागर यांनी त्यांना ही शपथ दिली.

यावेळी सदस्य मंगेश घाडगे उपस्थित होते. रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, निबंध स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा, विद्यार्थ्यांची प्रभात फेरी इत्यादी माध्यमातून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी नव्यानेच रुजू झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मतदानाच्या शपथेचा अर्थ समजावून घेतला. तसेच जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. शंभर टक्के मतदान हीच खरी योग्य आणि आदर्श व्यवस्था आहे. राज्यघटना आणि लोकशाही यांचा आदर राखण्यासाठी जास्तीत जास्त मतदान होणे आवश्यक आहे.

लोकशाही सुदृढ आणि बळकट होण्यासाठी आणि आपल्याला हवे असलेल्या विविध लाभ आणि योजनांच्या यशस्वीतेसाठी नैतिक बळ यावे म्हणून आपण मतदान करणे गरजेचे आहे. एक नागरिक या नात्याने मतदान हा जसा आपला हक्क आहे, अधिकार आहे ,तसेच ते कर्तव्य देखील आहे. अशा भावना यावेळी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. या उपक्रमासाठी प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.