सातारा बसस्थानकातील कचरा कुंडीत आढळले नवजात अर्भक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील कचरा कुंडीत नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

याप्रकरणी वंदना दिलीप भंडारे (रा. कुरुल सावली, ता. सातारा. सध्या रा. गुरुवार पेठ सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार हा गुन्हा नोंद झालेला आहे. दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सातारा मध्यवर्ती बसस्थानकात हा प्रकार उघडकीस आला.

बसस्थानकात बंद असलेले झुणका भाकर केंद्र आहे. या केंद्राजवळच कचरा कुंडी आहे. या कुंडीत उघड्यावर अज्ञात व्यक्तीने अर्भक ठेवल्याचे दिसून आले. अर्भक स्त्री जातीचे असून ते चार ते पाच दिवसांचे असल्याचा अंदाज आहे. परित्याग करण्याच्या उद्देशानेच त्याला सोडून दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सातारा मध्यवर्ती बसस्थानकात अर्भक सापडल्यानंतर खळबळ उडाली. तसेच विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. दिवसा की रात्रीच्या वेळी या नवजात अर्भकाला ठेवण्यात आले. कोणी आणि कशासाठी ठेवले याबाबत अधिक माहिती घेण्यात येत आहे.