सातारा प्रतिनिधी | प्रवासी व मालवाहतूक वाहनांसाठी एम एच ११ डी व्ही ही ०००१ ते ९९९९ नवीन मालिका दि. ७ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत देण्यात आली असून एम एच ११ डीव्ही या मालिकेकरता शासकीय नियमानुसार फी भरुन घेणे चालू केले आहे.
ज्यांना आपल्या वाहनास आकर्षक क्रमांक घ्यावयाचे आहेत. त्यांनी दि. ७ एप्रिल रोजी कार्यालयाशी संपर्क साधून आपले आकर्षक क्रमांक फी भरून आरक्षीत करून ठेवावेत. तसेच प्रवासी व माल वाहतूक परिवहन या मालिकेतील आकर्षक क्रमांक इतर परिवहन्नेतर वाहनांसाठी हवा असेल तर नियमानुसार तिप्पट फी भरून नोंदणी क्रमांक देण्यात येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार नोंदणी क्रमांक काटेकोरपणे नेमून देण्यात येतील. अर्जदारांना ओळख पटवण्यासाठी आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकीत प्रत सादर करावी लागेल. दि. ७ रोजी जे वाहनधारक चारचाकी वाहनासाठी तिप्पट फी भरून दुचाकी वाहन मालिकेतील वाहन क्रमांक घेण्यास इच्छुक आहेत. त्यांचे चारचारी वाहनांचे एलएमव्ही अर्ज आकर्षक क्रमांकासाठी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत धनादेशासह स्वीकारले जातील.
ज्या आकर्षक क्रमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाला असेल त्या अर्जदारास त्याच दिवशी आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. मात्र एकापेत्रा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणात अर्जदारांनी कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत निर्धारीत फी पेक्षा जास्त रकमेचा धनादेश बंद लिफाफ्यात सादर करावा. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनादेश सादर करेल. त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येणार आहे. दि. ८ रोजी आकर्षक क्रमांकासाठी सकाळी १० ते २ पर्यंत प्रवासी व माल वाहतूक वाहनांचे अर्ज धनादेशासह स्वीकारले जातील. आकर्षक नंबर घेतल्यानंतर १८० दिवसाच्या आत वाहन धारकांनी वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.