सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यात एसटी महामंडळाकडून नवीन बसचा समावेश होणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील लोकांची अडचण दूर होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरे (ता. महाबळेश्वर) येथील विविध विभागांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, महाबळेश्वर आगार व्यवस्थापक महेश जाधव, सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ व अधिकारी उपस्थित होते.
एसटी महामंडळाकडून शाळकरी विद्यार्थ्यांना सवलत आहे, तर मुलींना १२ पर्यंतचा प्रवास मोफत आहे. त्यातच आता महिलांना अर्धे दरात तिकीट मिळत असल्याने एसटीची प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढत आहे; परंतु एसटीकडे गाड्यांची उपलब्धता नसल्याने या प्रवासी संख्येचा लाभ महामंडळाला घेता येत नव्हता. ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला व वृद्ध एसटीचा प्रवास करतात. दुर्गम भागात महाबळेश्वर आगार सेवा देत असून, आगाराच्या ताफ्यात असणाऱ्या बसची संख्या, आवश्यक बस, नवीन दाखल झालेल्या बस त्यांचे मार्ग याबद्दल माहिती आगार व्यवस्थापक जाधव यांनी दिली.
ग्रामीण भागात अरुंद रस्ते असणाऱ्या मार्गावर मिनी बसची मागणी श्री. जाधव यांनी केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधून महाबळेश्वर आगारास नवीन बस उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही एसटीच्या अधिकाऱ्यांना दिली. दुरवस्था झालेल्या रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री शिंदे यांनी दिल्या.