कराडात रेल्वेचा नवीन मालधक्का सुरु; रेल्वे स्थानकावर हुंडेकरींनी वाढवला श्रीफळ

0
1176
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा हरित पट्टा म्हणून ओळखला जातो. यामुळे जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढली आहे. अगदी कराड, पाटण, खटाव तालुक्यातही साखर कारखाने कार्यरत आहेत. यामध्ये तयार होणारी साखर विविध भागात जात असते. कराड येथे आता रेल्वेचा धक्का वाढविण्यात आला आहे. त्याचा साखरेसह वाहतूक करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.

कराड रेल्वे स्टेशन येथील विस्तारीकरण करण्यात आलेला नवीन माल धक्का शुक्रवारपासून सुरू करण्यात आला. शुक्रवारी नवीन धक्क्यावर साखरेची पहिली रॅक भरण्यात आली. नवीन मालधक्का प्रशस्त असल्याने येथील कामाची क्षमता व वेगही आता वाढणार आहे. मालवाहतुकीच्या दृष्टीने कराड रेल्वे स्टेशनचा मालधक्का अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण सातारा व सांगली जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांच्या साखरेची वाहतूक कराड रेल्वे स्टेशनच्या माल धक्क्यावरून करण्यात येते.

शासकीय धान्य, सिमेंट व खतांची वाहतूकही कराडच्या मालधक्क्यावरून होत असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल कराड रेल्वे स्टेशनच्या माल धक्क्यावरून होते. पूर्वीपासून कराड रेल्वे स्टेशनला दोन मालधक्के आहेत. मात्र दोन्ही मालधक्के कमी लांबीचे असल्याने सेंटिंग करावे लागत होते. रेल्वे प्रशासनाने नुकतेच कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चुन स्टेशनच्या पूर्वेकडील मालधक्क्याचे विस्तारीकरण केले आहे. सिमेंट क्राँक्रीटचा लांब, रुंद व प्रशस्त मालधक्का बांधला आहे. यामुळे आता मालधक्क्याला एकाचवेळी पूर्ण रेल्वेत माल भरणे व उतरण्याची सोय झाली आहे. यामुळे कामाची क्षमता व वेगही वाढणार आहे.

हुंडेकरींच्या हस्ते नारळ फोडून नवीन मालधक्यावरील कामाची सुरुवात

काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी नवीन मालधक्का सुरू करण्यात आला. हुंडेकरी विश्वासराव सुर्वे यांच्या हस्ते नारळ फोडून नवीन मालधक्यावरील कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अमोल सुर्वे, किरण पवार, रामदास जाधव, सुनील चव्हाण, हिम्मत मदने, संदीप जाधव, अमोल जाधव, उमेश जाधव, चंदू देसाई, सुरेश साळुंखे, धनाजी साळुंखे, दत्ता कदम, शुभम माने, माथाडी कर्मचारी व ट्रक चालक, मालक उपस्थित होते.

रेल्वे प्रशासनाने नवीन मालधक्यावर सुविधा उभाराव्यात : विश्वासराव सुर्वे

पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचं असं रेल्वे स्थानक म्हणून कराड रेल्वे स्थानकाचे महत्व आहे. कराड रेल्वे स्टेशनच्या माल धक्क्यावर दररोज सुमारे १४४ माथाडी कामगार काम करतात. तर माल वाहतुकीसाठी ८० ट्रक काम करतात. रेल्वे प्रशासनाने नवीन प्रशस्त मालधक्का बांधल्याने आता कामाचा वेग वाढणार आहे. मात्र येथे काम करणाऱ्या कामगारांसाठी मुलभुत सोयी सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनाने नवीन मालधक्यावर लाइट, शौचालय, विश्रामगृह व पिण्याचे पाण्याची सोय करण्याची मागणी आम्ही केली असल्याची प्रतिक्रिया हुंडेकरी विश्वासराव सुर्वे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.