सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आता तासाभरातच माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. पण, या निवडणुकीत आघाडी आणि महायुतीतील सामना अधिक चुरशीचा आहे. कारण, प्रत्येक मतदारसंघात तगडे उमेदवार आहेत. यासाठी उमेदवारांना दुसऱ्या पक्षातून घेणे, नवीन चेहरे देणे असे प्रयोग करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत असून आघाडी आणि युतीतून आयात केलेल्या दोघांना उमेदवारी मिळाली आहे. बाकीचे सर्व उमेदवार प्रस्थापित असून त्यांचे मतदारसंघावर वर्चस्व आहे. तसेच निवडणुकीत आघाडीत राष्ट्रवादी आणि युतीत भाजपच मोठा भाऊ ठरला असून दोन्ही आघाड्यांनी पाच ठिकाणी नवीन चेहरे दिले आहेत.
फलटण मतदारसंघ युतीत राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपच्या सचिन कांबळे यांना प्रवेश देऊन उमेदवारी दिली. याठिकाणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची पूर्ण ताकद कांबळे यांच्या पाठीशी आहे. माणमध्येही आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पाचजण तयारीत होते.
प्रमुख दावेदार प्रभाकर देशमुख यांनी माघार घेतली. त्यामुळे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. माणच्या निवडणुकीत घार्गे राष्ट्रवादीकडून नवीन चेहरा आहेत. ते खटाव तालुक्यातील असल्याने त्यांचे राजकीय प्राबल्यही आहे. सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अमित कदम यांना उद्धवसेनेने प्रवेश दिला. तसेच सातारची उमेदवारीही बहाल केली. कदम निवडणुकीसाठी नवीन चेहरा आहेत. ते जावळी तालुक्यातील असून त्यांचे वडील तत्कालीन जावळी मतदारसंघाचे आमदार होते.
वाई मतदारसंघात आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने नवीन खेळी केली. अनेक इच्छुक असतानाही जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली. पिसाळ यांचे सासरे मदनराव पिसाळ राज्यात मंत्री होते. तसेच त्यांचे पती जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. पिसाळ यांच्यामुळे वाई मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार आहे. पिसाळ या प्रथमच निवडणूक लढवत आहेत.
पाटणलाही नवीन चेहरा
पाटण मतदारसंघातील निवडणूक ही नेहमीच देसाई आणि पाटणकर गटात होत आली आहे. राजकीय पक्षापेक्षा गटाची ताकदच मतदारसंघात अधिक राहते. मागील अनेक निवडणुका शिवसेनेतून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लढवल्या. पण, पक्ष फुटीनंतर देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. त्यांना शिंदेसेनेतून उमेदवारी मिळाली, तर उध्दवसेनेने देसाई यांचे विरोधक हर्षद कदम यांना निवडणूक रिंगणात उतरवले. कदम हेही देसाई यांच्यापुढे नवखे उमेदवार ठरले आहेत.