कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील म्हसोली गावात नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी सरपंच सौ. सुमती शेवाळे यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रास सुपूर्द करण्यात आली.
यावेळी म्हासोली गावात पार पडलेल्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी डॉ. स्नेहा मोरे, डॉ. राजनंदिनी मोरे, उपसरपंच विनय पाटील, सदस्य उत्तम कुंभार, गौतम कांबळे, बाळकृष्ण पाटील, चेअरमन धनाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव चोरगे, दादासो पाटील, अशोक चव्हाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
म्हसोली गावास नवीन रुग्णवाहिका मिळाल्याने शहरी भागात एखाद्या रुग्णास नेण्याची सोय झाली आहे. काहीवेळा पावसाळ्यात तसेच रात्रीच्यावेळी एखादी अपघाताची घटना अथवा अचानक एखादा प्रसंग घडल्यास शहरी भागातून रुग्णवाहिका पोहचण्यास वेळ लागतो. मात्र, आता म्हासोली गावात रुग्णवाहिका दाखल झाल्याने एखाद्या रुग्णास शहरी भागातील दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाण्याची सोय झाली आहे.