सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसा स्थळ व आपल्या रंगीबेरंगी सौंदर्याने प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर सध्या पर्यटकांकडून मोठ्या संख्येने भेटी दिल्या जात आहेत. शिवाय या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने हिरवी चादर पसरली आहे. पठाराच्या आणि येथे उमलणाऱ्या फुलांच्या संरक्षणासाठी कास पठार कार्यकारी समिती मार्फत तंगूसाची जाळी बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
सुंदर अशा कास पठारावर यापूर्वी लोखंडी जाळी होती पण पर्यावरण दृष्ट्या कासच्या फुलांना धोका बसू लागला. तसेच पठारावरील वन्यप्राण्यांच्या अधिवासामुळे याठिकाणी अडथळे येऊ लागले. या गोष्टी लक्षात घेत दोन वर्षांपूर्वी ही जाळी प्रशासनाच्या वतीने काढण्यात आली. या जाळीमुळे पठारावरील फुले ही कमी झाल्याची ओरड होत होती. त्यामुळे संपूर्ण लोखंडी जाळी काढण्यात आली. तरीही शेकडो हेक्टर पठारावर आगामी हंगामाच्या दृष्टीने हजारो पर्यटकांना नियंत्रित करणे अवघड काम असल्याने तात्पुरती तंगूसाची जाळी फुलांच्या हंगामाच्या काळात बसवण्यात येते.
जुलै महिन्यापासून कासवर मोठ्या संख्येने फुलांना बहर यायला सुरुवात होते. आगामी हंगामाच्या दृष्टीने छोटीमोठी कामे कास पठाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कास समिती मार्फत सुरू करण्यात आली आहेत. फुलांच्या वळण्यास सुरुवात झाली कि या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात.