सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी किमान आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी म्हंटले.
दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या संघटनाच्या स्वीपच्या अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या स्थायी सभागृहात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, अर्चना वाघमळे, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे, जिल्हा दिव्यांग पुनवर्सन केंद्राचे समन्वयक गौरव जाधव, दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी कृष्णा पवार, नारायणा निकम, नामदेव इंगळे, अविनाश कुलकर्णी, अक्षय बाबर,अमोल कारंडे, प्रविण डांगे, समिना शेख, दीपक खडंग, सुरेश माने, राजेंद्र पवार, नंदकुमार धनवडे, अनिता धनवडे आदी उपस्थित होते.
यावेळी मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी उभारण्यात येणाऱ्या सोयीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यकार्यकारी अधिकारी नागराजन यांनी दिव्यांग मतदारांनी सक्षम मोबाईल ॲप व पोस्टल बॅलेट सुविधेचा वापर करण्याबाबत आवाहन केले.दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविण्यासाठी दिव्यांग संघटनांनी त्यांचे अभिप्राय देखील नोंदविले. या अभिप्रायानुसार जिल्हा प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात येईल, असे श्रीमती नागराजन यांनी संघटना प्रतिनिधींना आश्वासित केले. दिव्यांग संघटनांनी त्यांचे स्तरावरुन जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याबाबत त्यांनी आवाहन केले.
दिव्यांग मतदारांना ‘या’ असणार सोयी सुविधा
दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सुविधा, व्हिलचेअरची सुविधा, वाहतुकीची सुविधा, ईव्हीएममध्ये ब्रेलची सुविधा, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी अडथळा विरहित प्रवेशाची व्यवस्था, दिव्यांग व अति (८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक) मतदारांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा, दिव्यांग (अंध व अल्पदृष्टी) मतदारासाठी भिंगाची सोय, दिव्यांग मतदारांसाठी वेगळी रांगेची सुविधा इत्यादी सुविधा मतदान केंद्रावर पुरविण्यात येणार असल्याची माहिती याशनी नागराजन यांनी दिली.