कराड तालुक्यातील ‘या’ रेल्वे गेटवरील चुकीच्या कंबाबत ग्रामस्थ आक्रमक; थेट दिला आंदोलनाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शिरवडे स्टेशनजवळील रेल्वे गेट क्र. 95 चुकीच्या पद्धतीने बंद करून, चुकीच्या ठिकाणी बोगदा करण्यात आला. हे काम करत असताना स्थानिकांच्या रहदारीच्या सोयीचा विचार न करता, काम केले जात आहे. त्यामुळे रेल्वेचे सध्याचे व तत्कालीन अधिकारी, दुहेरीकरण प्रकल्पाचे अधिकारी व कंत्राटदारांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत. तसेच या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काम तत्काळ थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नडशी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे गेट क्र. 95 येथे बोगदा केल्यास, तीव्र उतार निर्माण होईल. या जागी यापूर्वी बांधण्यात आलेल्या बोगद्यात जास्त पाणी साठण्याची शक्यता असल्याने, ही जागा बोगद्याकरिता अयोग्य असल्याची खोटी माहिती मुख्य अभियंता सुरेश पाखरे, उपमुख्य कार्यकारी अभियंता सागर चौधरी यांनी जिल्हाधिकार्‍यांसमोर सादर केली.

प्रत्यक्ष पाहणीवेळी उपस्थित जमावापुढे रेल्वे अधिकार्‍यांनी ही जागा योग्य असल्याचे सांगितले होते. रेल्वेच्या निकषांप्रमाणे बोगद्याची उंची कमीत कमी पाच मीटर व रुंदी 4.5 मीटर असते; परंतु सध्याच्या बोगद्याची उंची दक्षिणेस 4.10 मीटर, उत्तरेस 4.30 मीटर आणि रुंदी 4.25 मीटर आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री, मुख्य व्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतरही पोलीस बळाच्या जोरावर ग्रामस्थांच्या जीवावर बेतणारे चुकीचे काम केले जात आहेत. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काम तत्काळ थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. या निवेदनावर 1300 हून अधिक नागरिकांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, प्रांताधिकारी व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.