कराड प्रतिनिधी । अतिवृष्टी तसेच महापुराच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची जिल्हा प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच या काळात बचाव कार्य करण्यासाठी राज्य सरकारची NDRF ची एक टीम कराड येथे या आठवड्यात दाखल झाली आहे. या टीमच्या जवानांच्या वतीने कराड येथील यशवंतराव स्मृती सदन (टाऊन हॉल) मध्ये पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी उप मुख्याधिकारी विशाखा पवार, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, जलनि:स्सारण अभियंता ए. आर. पवार, मुरलीधर धायगुडे, अग्निग्नशमन विभाग प्रमुख विनोद काटरे व पालिकेचे सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या सूचनेवरून व कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी NDRF च्या जवानांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले.
महापूराची आपत्ती आल्यास काय करायचं? NDRF च्या जवानांनी दिले कराड पालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण pic.twitter.com/wREd72lOBA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 31, 2023
यावेळी NDRF टीमच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, एनडीआरएफ ही यंत्रणा मुख्यत्वे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणासाठी कार्य करते. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हे पथक परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कार्य करते. भूकंप, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींवेळी या दलाला पाचारण करण्यात येते. नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती उद्भवली तर त्यावेळेस तातडीने जीव वाचण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते.