रौप्य महोत्सवात साताऱ्यातून राष्ट्रवादीचं घड्याळ हद्दपार, खासदार राष्ट्रवादीचा असताना जागा गेली भाजपाकडं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचं हे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू असताना यंदा लोकसभा निवडणुकीत या पक्षाचं घड्याळ चिन्हच सातारा जिल्ह्यातून हद्दपार झालं आहे.

रौप्य महोत्सवी वर्षात चिन्ह हद्दपार

राष्ट्रवादी काँग्रेसला स्थापनेनंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात मोठं यश मिळालं होतं. सातारा जिल्ह्यानं शरद पवारांना खंबीर साथ दिली होती. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत साताऱ्यातील कराड दक्षिण वगळता उर्वरीत 9 मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर हा पक्ष जवळपास 17 वर्षे सत्तेच्या वर्तुळात वावरत राहिला. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू असताना लोकसभा निवडणुकीतून या पक्षाचं घड्याळ चिन्ह हद्दपार झालं आहे.

साताऱ्यातून सुरू झाला होता राष्ट्रवादीचा झंझावात

राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याला साताऱ्यातून मोठा पाठिंबा मिळाला. 10 जून 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर जिल्ह्यात सर्वात आधी पाटणचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पक्षात प्रवेश केला. त्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमसिंह पाटणकर (पाटण), अभयसिंहराजे भोसले (सातारा), रामराजे नाईक-निंबाळकर (फलटण), बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), शशिकांत शिंदे (जावली), शालिनीताई पाटील (कोरेगाव), संपतराव अवघडे (माण), भाऊसाहेब गुदगे (खटाव), मदन पिसाळ (वाई) हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले होते. सातारा लोकसभा मतदार संघातून लक्ष्मणराव पाटील आणि कराडमधून श्रीनिवास पाटील हे घड्याळ चिन्हावर खासदार झाले होते.

अजितदादांकडून साताऱ्याची जागा निसटली

लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असणाऱ्या जागा संबंधित पक्षाला सोडायच्या ठरलं असताना अजित पवार गटाला सातारची जागा मिळविण्यात अपयश आलं. त्यांनी अखेरपर्यंत आटोकाट प्रयत्न करूनही साताऱ्याची जागा निसटली आणि भाजपने ती आपल्या पदरात पाडून घेतली. शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर होऊन सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मंगळवारी सकाळी भाजपाने उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा केली.

काका-पुतण्याच्या गटातील लढत टळली

साताऱ्याच्या जागेवरून गेली काही दिवस राजकीय घडामोडी सुरू होत्या. त्यात अजितदादा गटाला एक पाउल मागे घ्यावं लागलं. वास्तविक, दोन्ही गटाचा उमेदवार एकमेकांसमोर येईल आणि बालेकिल्ल्यात काका-पुतण्याच्या गटातील लढत पाहण्याची ऐतिहासिक संधी मिळेल, असं वाटत होतं. मात्र, भाजपाकडे जागा गेल्यामुळं ती संधी हुकली.