सातारा प्रतिनिधी । भाजपच्यावतीने महाविकास आघाडीच्या निषेधार्थ नुकतेच आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कंत्राटी भरती रद्द केल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात झालेले आजचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. मागील अधिवेशनात कंत्राटी भरतीचे बिल तुम्हीच मंजूर केले होते, आता का बदलत आहात. हे तुमचे पाप असून, ते दुसऱ्याच्या माथी फोडू नका. तुमच्या पापाचा घडा भरलाय, असा थेट इशारा आ. शिंदे यांनी दिला आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘‘राज्यात सरकार भाजपचे, गृहमंत्री त्यांचाच, त्यांच्याच सरकारने निर्णय घेतलेला असताना भाजप आंदोलन करतंय ही हस्यास्पद बाब आहे. या बिलाला आम्ही विधीमंडळात विरोध केला होता. त्यावेळी कोरोना काळात भरती करू शकत नसताना प्रक्रियेला विलंब लागत असल्याने ११ महिन्यांसाठी कंत्राटी भरती करतोय, असे गृहमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितले होते.
असे असताना त्यांनी माननीय शरद पवारसाहेब व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्या काळात झाले असल्याचे सांगत धडधडीत खोटे बोलत आहेत. लोकांचा यावर आता विश्वास राहिलेला नाही. प्रत्येक वेळी महाविकास आघाडी जबाबदार असल्याचे सांगत पळवाटा काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. जनतेचा रोष पाहून भाजपने आज आंदोलन केले असल्याचे आ. शिंदे यांनी म्हंटले.