मकरंद आबांची कोलांटीउडी; आधी साहेबांसोबत गाडीत अन् आता अजितदादांना पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडखोरी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उभी फूट पडली असून आमदारांमध्ये विभागणी झाली आहे. ३० पेक्षा जास्त आमदारांनी अजित पवारांना थेट समर्थन दिले आहे तर बाकी १५ ते १७ आमदारांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता शरद पवार यांच्यासोबत असलेले साताऱ्यातील वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन अजितदादांना आपला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यात शरद पवारांच्या कराड दौऱ्यावेळी मकरंद पाटील हे त्यांच्या गाडीतच होते, मात्र आता अचानक त्यांनी अजितदादांना समर्थन दिल्याने शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

खरं तर अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होत राजभवनावर जाऊन शपथविधी घेतला त्यावेळी त्या शपथविधी सोहळ्याला मकरंद पाटील यांनी हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार कराड दौऱ्यावर आले असता मकरंद पाटील पवारांच्या सोबत दिसले. शिरवळ येथे त्यांनी शरद पवारांचे स्वागत करून ते येथूनच त्यांच्या गाडीत बसून आले होते . विशेष म्हणजे संपूर्ण दौऱ्यात ते शरद पवारांच्या सोबतच होते. मात्र त्यानंतर ४ दिवसातच मकरंद आबांनी पुनः एकदा कोलांटी उडी मारत अजित पवारांना आपला पाठिंबा दिला.

वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वांनीच किसन वीर कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी मकरंद पाटलांनी अजित पवारांसोबत जावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर मकरंद पाटील यांनी अजितदादांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट देऊन त्यांना आपला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, शशिकांत पिसाळ, राजेंद्र राजापुरे, अमित कदम आणि कार्यकर्त्ये उपस्थित होते.