कराड प्रतिनिधी । दरवर्षी पंढरपूरला आषाढी वारीच्या निम्मिताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून दाखल होत असतात. यात महिलांची संख्याही लक्षणीय असते. शासनाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलने आवश्यक आहेत. वारीमध्ये अथवा इतर ठिकाणी सुद्धा कोणत्याही महिलेला कुठेही त्रास झाला तसेच कोणताही नराधम हा महिलांना त्रास देत असेल तर त्यांनी तातडीने महिला हेल्प लाईनशी संपर्क साधा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
फलटण येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते नुकताच ‘आरोग्य वारी अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलंडे, फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय अधिकारी वाई खंडाळा राजेंद्र जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण राहुल दस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, क्रांती बोराटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा), सतीश कुंभार गटविकास अधिकारी फलटण, समीर यादव तहसीलदार फलटण, अजित पाटील तहसीलदार खंडाळा, श्री गायकवाड मुख्याधिकारी फलटण, तसेच पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या, राज्यातील सरकारने गृह खात्यातील यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. आज अनेक महिला व मुली बेपत्ता आहेत तसेच महिला व मुलींना नोकरीचे आमिष दाखवून बाहेर गावी नेऊन त्यांची फसवणूक केली जाते. शासनाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलने आवश्यक आहेत.
स्वतः वारीत सहभागी होऊन महिलांच्या अडचणी जवळून पाहिल्या आणि आयोगाच्या माध्यमातून आरोग्य वारी अभियान हा उपक्रम राबवण्याची संधी मिळाली. माझ्या वारकरी महिला भगिनींच्या चेहन्यावर उमटत असलेला आनंद हेच माझ्या विठ्ठलाचे दर्शन असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.