कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या बालेकिल्ल्याला भाजपकडून अनेक हादरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी हा बालेकिल्ला कुणाच्याही हातात जाऊन दिलेला नाही. आगामी सातारा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी कुणाला निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार हे पहावे लागणार आहे. अशात विधानपरिषदेचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे. “आगामी काळामध्ये मला तुम्ही फक्त दिल्लीत सोडा; बघा मी काय – काय करून येतो. दिल्लीत जाण्याची माझी पहिल्यापासूनची इच्छा आहे,” असे मत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ बूथ कमिटी सदस्यांचा फलटण येथे नुकताच मेळावा पार पडला. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील बढे नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे निरीक्षक, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अरुण लाड, आमदार दिपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश आयटी सेलचे प्रमुख सारंग पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर उपस्थित होते.
यावेळी निंबाळकर म्हणाले की, 1996 साली यांचे वडील चुकून निवडून आले होते. त्याच प्रमाणे 2019 साली हे चुकून निवडून आले आहेत. ते काही फलटण तालुक्यामुळे निवडून आलेले नाहीत. तर ते सोलापूर जिल्हा विशेतः माळशिरस तालुक्यामुळे निवडून आले आहेत. आता आगामी काळामध्ये काहीही झाले तरी सुद्धा कोणत्याही निवडणुकीला “तू फक्त उभाच रहा; तुला आता पाडणारच आहे”; असा इशारा निंबाळकरांनी भाजप खासदार रणजितसिंह यांचे नाव न घेता दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार सर्व विधानसभा मतदारसंघ निहाय बुथ कमिट्या सक्षम करण्याचे काम सर्वत्र सुरू आहे. भाजपच्या निवडणुकीतील रणनितीला तोडीस तोड उत्तर देणारी यंत्रणा बुथ कमिटीच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये उभी करणार आहे. आमच्या जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाकडून भाजपामध्ये गेलेली नेतेमंडळीच भाजपाला संपविणार असून तालुक्यातील स्थानिक पातळीवर आमचेच दोन वेगवेगळे गट तयार झालेले आहेत. त्या दोन्ही गटांना एकत्रित आणण्यासाठी आपणाला प्रयत्न करावा लागणार आहे, असे मत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.