सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याच्या प्रस्तावात एक नवीन मागणी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा विटा हा सुवर्णनगरी जिल्हा करण्याची मागणी केली आहे.
अॅड. मुळीक यांनी सांगितले की, विटा हे जिल्हा केंद्र करून खानापूर, आटपाडी, खटाव, माण, कडेगाव, पलूस या सहा तालुक्यांच्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी. या नवीन जिल्ह्याला सुवर्णनगरी हे नाव देण्यात यावे, असे त्यांनी सुचवले. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यात सध्याचा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, कडेगाव या तालुक्यांचा समावेश होता. तसेच औंध, जत, फलटण, कुरुंदवाड, सांगली, मिरज, बुधगाव ही संस्थाने होती.
विटा परिसरावर चालुक्यांचे राज्य होते, हे ऐतिहासिक तथ्य देत अॅड. मुळीक म्हणाले की, श्री. शां. भ. देव लिखित महाराष्ट्र गोवे शिलालेख या पुस्तकाच्या 613 क्रमांक पानावरील कानडी शिलालेखात संक्रांतीच्या मुहूर्तावर राजधानी भाळवणी येथील जैन विहाराला जमिनीचे दान दिल्याची नोंद आहे. यावरून या भागाची राजधानी भाळवणी येथे होती असे दिसते. सध्या विटा येथे खानापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव तालुक्यांसाठी अतिरिक्तजिल्हा व सत्र न्यायालय अस्तित्वात आहे. तसेच वडूज येथे माण व खटाव तालुक्यासाठी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय अस्तित्वात आहे. विटा, कडेगाव व वडूज येथे उपविभागीय अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत.
संपूर्ण भारतासह नेपाळ, श्रीलंका या ठिकाणी कार्यरत असणारे गलाई व्यावसायिक हे खानापूर, आटपाडी, खटाव, माण, कडेगाव, पलूस या तालुक्यांतील आहेत. या सर्व कारणांमुळे या सहा तालुक्यांचा जिल्हा निर्माण करावा, असे मुळीक यांनी म्हटले आहे.