सातारा प्रतिनिधी । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्य जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विशेष प्रवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, त्यांच्यानंतर मंत्री छगन भुजबळ व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उपस्थित राहत सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. भुजबळांच्या अभिवादनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) व मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत फुले दाम्पत्याच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घातला.
खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आले होते. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यांच्या अभिवादनानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) व मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) व मनसेच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औदयोगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहून अभिवादन केले. मात्र, आज ज्या वृत्तीने ज्या मनुवादी स्मृतींनी व विचारांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना प्रचंड त्रास दिला. त्यांची नाहक बदनामी केली. अशा प्रकारच्या वृत्तीच्या बरोबर हे लोक जाऊ मंत्रिपद भोगतात.
स्वतःच्या लालसेपोटी स्वतःचे आरोप लपवण्यासाठी हे लोक त्याच्यासोबत जाऊन बसतात. असे असताना हे लोक आज या ठिकाणी येऊन सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. म्हणून या विरोधात आम्ही सावित्रीबाई यांना दुग्धाभिषेक घातला. भुजबळ आणि चाकणकर यांना विनंती करतो कि त्यांनी इथून पुढे त्यांनी या ठिकाणी अभिवादन करताना विचार करावा. मंत्री भुजबळ आणि चाकणकर यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) व मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध नाही, विरोध भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना
आमचा छगन भुजबळ आणि रुपाली चाकणकर यांना विरोध आहे. स्मृती स्थळावर पवित्र ठिकाणी येऊन घोटाळा केलेले व्यक्ती याठिकाणी येतात याला आमचा विरोध आहे. मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध नाही, पण भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना आमचा विरोध आहे. मराठा आरक्षणाशी या कृतीला जोडू नका, असे यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मराठा कार्यकर्त्याने म्हंटले.