डॉ. तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत ‘रोटरी क्लब ऑफ कराड’चा पदग्रहण सोहळा उत्साहात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । “बदलत्या युगामध्ये आणि धावत्या जगामध्ये आपण डिजिटल तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो आहोत. डिजिटल तंत्रज्ञान जितके फायदेशीर आहे, तितकेच योग्य काळजी न घेतल्यास ते घातक ही आहे. विशेषतः या डिजिटल साधनांचा वापर करताना डोळ्याची सुरक्षितता जपणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.

कराड येथील टाऊन हॉलमध्ये शनिवारी रोटरी क्लब ऑफ कराड चा 68 वा पदग्रहण सोहळा, रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटीचा पदग्रहण सोहळा व रो.डॉ.अस्मिता फासे निर्मित कला प्रदर्शनाचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. यावेळी ‘डिजिटल साधनांचा वापर व डोळ्यांचे आरोग्य’ या विषयावर डॉ, खाणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास असिस्टंट गव्हर्नर रो. राजीव रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रोटरी क्लब ऑफ कराड चे नूतन प्रेसिडेंट रो.रामचंद्र लाखोले यांनी मावळते प्रेसिडेंट रो.बद्रीनाथ धस्के यांच्याकडून पदभार स्वीकारला. नूतन सेक्रेटरी रो.आनंदा थोरात यांनी मावळते सेक्रेटरी रो. शिवराज माने यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी रोटरी क्लब ऑफ कराडचे सर्व डायरेक्टर यांनीही पदभार स्वीकारला. या कार्यक्रमांमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी प्रेसिडेंट रो.अजीम कागदी, सेक्रेटरी रो. प्रथमेश कांबळे व संचालक मंडळाने आपला पदभार स्वीकारला.

यावेळी डॉ. लहाने म्हणाले, आपण संकटे आणि समस्या याचा बाऊ न करता त्याला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आज मोबाईल आणि संगणक याचा वापर करताना सुरक्षितता न बाळगल्याने अनेक गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संगणक असो किंवा मोबाईल असो याचा वापर करताना आपण किमान 45 सेंटीमीटर अंतर ठेवणे गरजेचे आहे. डोळ्यांच्या पापण्यांची ठराविक वेळेत उघड झाप झाली पाहिजे.‌ गरज असेल तरच मोबाईलचा वापर करावा. आपण आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे, हे आपल्याला हिताचे आहे.

यावेळी पॉल हॅरीस झालेल्या रोटरीयन मेंबरचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर वाहगाव येथील दिव्यांग व कर्णबधिर मुलीला कानातील अत्याधुनिक मशीन देण्यात आले. मधुमेह प्रोजेक्ट करत असलेल्या कामाबद्दल डॉ.राहुल फासे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सातारा कॉप्स मधील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी, विविध संस्था आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती.