सातारा प्रतिनिधी | हर घर तिरंगा अभियानांतर्गत सातारा नगर परिषदेच्यावतीने शिवतीर्थ ते स्मृती उद्यानापर्यंत मंगळवारी तिरंगा रॅली आयोजन करण्यात आले. यावेळी तिरंगा रॅली व बाईक रॅलीला नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.
या तिरंगा रॅलीमध्ये शहरातील १५ विद्यालये व ५ महाविद्यालये यांचे एकूण 1 हजाराहून विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांच्यासह, महिला बचत गटाच्या महिला, सफाई कर्मचारी व सातारा नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकारी यांच्यासह सातारा शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.
नगर परिषदेमार्फत सातारा शहरामध्ये ३ विविध ठिकाणी तिरंगा कॅनवासची निर्मिती करण्यात आली आहे. यावर आत्तापर्यंत १ हजार ८०० लोकांची स्वाक्षरी नोंद झाली आहे. शहरातील स्मृती उद्यान येथे ६ तिरंगा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. तसेच हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तिरंगा रॅलीची सांगता तिरंगा शपथ घेऊन करण्यात आली. 14 ऑगस्ट रोजी हुतात्मा उद्यान येथे रक्तदान शिबीर व तिरंगा, स्वातंत्र्य दिन संबंधी वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादी विक्रीसाठी तिरंगा मेळा आयोजित करण्यात आला आहे.