कराड प्रतिनिधी । महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदेंनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, काल त्यांच्यावर कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला. महेश शिंदेच्या आरोपानंतर आता माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी देखील शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “साताऱ्याच्या तुतारी चिन्हाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा केला आहे. हि गोष्ट खूप लांच्छनास्पद आहे. आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते यावर आम्ही पवार साहेबांना काही बोलूच शकत नाही,” अशा शब्दात माथाडी नेते नरेंद्र पाटलांनी शिंदेंवर हल्लाबोल केला.
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी पोटाच्या बेंबीच्या देठापासून मला विरोध केला होता. एका माथाडी चळवळीत आपण काम केल्यानंतर आजपर्यंत माझ्या कुटुंबीयांनी आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाच्या दृष्टिकोनातून काम केले. शेवटचा विजय त्यांचा कोरेगाव मतदार संघातून झाला.
परंतु २०२९ ला त्यांनी आमच्या ज्या काही सहकार्यांना हाताशी धरून ज्या पद्धतीने आमच्या विरोधामध्ये जे काही कटकारस्थान केले. त्याचे रिटर्न गिफ़्ट म्हणून कुठे तरी देण्याची संधी मला यानिमित्ताने आलेली आहे. निवडणुकीचा अजून बराचसा काळ बाकी आहे. त्यानंतर एक एक उलगडा आपण त्यावेळेला करू, असा सूचक इशारा देखील यावेळेला नरेंद्र पाटील यांनी दिला.
अजूनही उमेदवारी मिळेल असा विश्वास वाटतो : नरेंद्र पाटील
यावेळी नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यातुन म्हातुटीतून आपल्याला उमेदवारी मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला. भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले, मी स्वतः, धैर्यशील कदम आणि अजून काही उमेदवार इच्छुक आहेत. मला विश्वास आहे कि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे साताऱ्याच्या जनतेचा कौल घेऊन चांगला उमेदवार देतील, असे नरेंद्र पाटील यांनी यावेळी म्हंटले.
शशिकांत शिंदेंवर विरोधकांकडून टार्गेट करण्यास सुरुवात
साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर काल गंभीर आरोप केले. महेश शिंदे यांनी नवी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे विक्री प्रकरणात 4 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर आता माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी देखील शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधकांकडून करण्यात आलेल्या या टीका- आरोपाच्या दरम्यान, आज शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काळ महेश शिंदे यांच्या आरोपांवर उत्तर दिल्यानंतर आता नरेंद्र पाटील यांच्या टीकेला शशिकांत शिंदे नेमका कसं उत्तर देणार? हे पहावे लागणार आहे.