सातारा प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि त्यांच्या मंत्री मंडळाचा शपथविधी आज दि. 9 जून 2024 रोजी सायंकाळी राष्ट्रपती भवनात संपन्न होणार आहे. या सोहळ्याला जगभरातून सात हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले असून या सोहळ्याला आशियातील पहिल्या लोको पायलट व सातारच्या कन्या सुरेखा यादव (Surekha Yadav) यांना देखील शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या वंदेभारतचे सारथ्य करणाऱ्या सुरेखा यादव त्या दहा लोको पायलट मध्ये सामील आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी असलेल्या सुरेखा यादव या 1988 मध्ये भारताच्या पहिल्या महिल्या ट्रेन ड्रायव्हर बनल्या. त्यांना या साहसी क्षेत्राची निवड करून यशस्वीपणे कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळविले. वंदे भारत चालविणाऱ्या सुरेखा यादव यांनी सुरुवातीला मालगाडी ड्रायव्हरचे काम केले. त्यानंतर लांबपल्ल्यांच्या गाड्या चालविल्या. त्यानंतर दहा वर्षे मुंबईतील उपनगरीय लोकल चालविण्याचे कठीण काम केले आहे. नोकरीच्या सुरुवातीला पाच वर्षे सहायक लोको पायलट म्हणून सुरेखा यादव यांनी काम केले आहे. त्यानंतर मालगाडी चालविण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. वंदे भारत चालविण्यापूर्वी बडोद्यात त्यांना आठ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.
2000 मध्ये मुंबईत उपनगरीय लोकल चालविली तेव्हा आशियातील पहिल्या महिला लोकोपायलट म्हणून बिरुद त्यांना लागले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे पती रिटायर झाले आहेत. तर दोन्ही मुलांनी इंजिनियर करुन त्यांची लग्नं झाली असल्याने जबाबदारी सुटका झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता लवकरच त्या निवृत्त होत आहेत.
कोण आहेत सुरेखा यादव?
सुरेखा यादव यांचा जन्म 2 सप्टेंबर 1965 मध्ये सातारा येथील सोनाबाई आणि रामचंद्र भोसले यांच्या घरी झाला. त्यांचे वडील लहान शेतकरी होते. सुरेखा त्यांच्या पाच बहिण भावंडात सर्वात मोठी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल सातारा येथे झाले. त्यांनी शालेय शिक्षणानंतर व्यावसायिक प्रशिक्षणात प्रवेश घेतला. बीएस्सी नंतर कराड येथील सरकारी पॉलिटेक्निकमधून सुरेखा यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केला आहे. त्यानंतर त्या रेल्वेत जॉईंट झाल्या.