कराड प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याकडून जोरदारपणे प्रचार केला जात आहे. त्यांच्या प्रचारासाठी राज्यातील भाजपमधील अनेक दिग्गज उपस्थिती लावणार असून त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची कराडमध्ये येत्या मंगळवार, दि. ३० एप्रिल रोजी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
कराड येथे शुक्रवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला अतुल भोसले, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड दक्षिण भाजपा तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, भाजपा कोअर कमिटी पदाधिकारी यांच्यासह भाजपची वरिष्ठ नेतेमंडळीही उपस्थित होती. या बैठकीत मोदींच्या सभेचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार 30 एप्रिलला मोदींची कराडला सभा होणार असून, सुमारे 20 एकर जागेवर या सभेचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.
कराड येथे होणाऱ्या या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले असून मोदींची ही सभा टोलेजंग होण्याच्या द़ृष्टीने व्यापक नियोजन केले जात आहे. सुमारे 20 एकर जागेवर ही सभा होणार आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराला आणखी वेग आला आहे. खा. उदयनराजे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी अतुल भोसले प्रयत्नशील होते. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोदींच्या सभेचे नियोजन करण्यासाठी पाठपुरावा केला.
कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण या तीन विधानसभा मतदारसंघांसाठी कराड हे मध्यवर्ती ठिकाण समजले जाते. त्यामुळे मोदींची सभा कराड येथे घेण्याचे निश्चित झाले. या सभेचा प्रभाव या तीन मतदारसंघांसह संपूर्ण सातारा जिल्हा त्याचबरोबर लगतच्या सांगली व कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांवरही राहणार आहे. त्याद़ृष्टीने ही सभा यशस्वी करण्यासाठी काटेकोर नियोजन केले जात आहे. 2019 मध्ये झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीवेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातार्यात सैनिक स्कूलच्या मैदानावर सभा झाली होती.