कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र गोदी यांच्या कराडमध्ये होणाऱ्या सभेत बदल करण्यात आलेला आहे. जी सभा ३० एप्रिल रोजी होणार होती ती आता २९ एप्रिल रोजी सोमवारी सैदापूर येथे दुपारी दोन वाजता होणार आहे. पुणे व बारामती येथील सभांची कार्य व्यस्तता लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे नियोजन करण्यात येत आहे.
खासदार उदयनराजे खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी येत असून संपूर्ण सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष नरेंद्र मोदी यांच्या सभेकडे लागून राहिले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यात चुरशीची लढत होत आहे भारतीय जनता पार्टीने उदयनराजे भोसले यांचा प्रचार जोरदार व्हावा यासाठी महायुतीचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष सभेचे आयोजन केले आहे.
सैदापूर येथील सभेस एक लाखापेक्षा अधिक लोक येतील असे नियोजन केले आहे. मात्र ही सभा दुपारी दोन वाजता असल्याने दुपारच्या रणरणत्या उन्हाची झळ बसण्याची शक्यता आहे. २०१९ च्या पोटनिवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात आले होते. त्यावेळी ही सभा येथील सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर झाली होती.
नरेंद्र मोदी सभेत काय बोलणार ?
राज्यसभेचे खासदार असणारे उदयनराजे लोकसभेसाठी पुन्हा रणांगणात उतरले आहे त्यामुळे उदयनराजेंसाठी सातारकरांना साद घातली जाणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेत काय बोलणार ? हा उत्सुकतेचा विषय आहे. पुणे आणि बारामती या सभांची वेळ व प्रवासाचे अंतर या गोष्टी लक्षात घेऊन ३० एप्रिल ऐवजी २९ एप्रिल रोजी ही सभा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
साडेसातशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात
पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच भाजप कार्यकारिणीचे निवडणूक प्रभारी अतुल भोसले प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर इत्यादी मान्यवरांनी सैदापूर येथील सभास्थळाची पाहणी केली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा लक्षात घेऊन तेथे एक सीआरपीएफ कंपनी तसेच जलद प्रतिसाद पथक आणि साडेसातशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.