कराड प्रतिनिधी | कराड येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेससह इतर इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. “सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून समाजात फूट पाडत आहेत. इंडिया आघाडी आणि काँग्रेस तिसऱ्यांदा सत्तेत आले तर संविधान बदलतील. मात्र, मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
कराड येथे आज साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. यावेळी ते पुढे म्हणाले की, काँग्रेसची सत्ता असताना सरकारी गोदामांमध्ये हजारो टन धान्य सडायचे. मात्र, काँग्रेस सरकार ते गरिबांना द्यायला तयार नव्हते. काँग्रेस सरकारने गरिबांमध्ये धान्य वाटप करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. डॉ. मनमोहन सिंह त्यावेळी पंतप्रधान होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये. म्हणजे गरीब उपाशी मेला तर मरू दे, धान्य सडले तर सडू दे, पण काँग्रेस सरकार गरिबांना धान्य द्यायला तयार नव्हते. आज आपले सरकार दर महिन्याला 80 कोटी गरजू लोकांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा करत आहे.
”1947 साली जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला. मात्र, काँग्रेसने तेव्हा देशात गुलामगिरीची मानसिकता वाढू दिली होती. छत्रपती महाराजांच्या नौदलावर साऱ्या जगाचा विश्वास होता, पण इतकी वर्षे स्वतंत्र भारताच्या नौदलाच्या ध्वजावर ब्रिटिशांचे चिन्ह होते. मी आल्यानंतर इंग्रजांच्या या चिन्हात बदल केला. आपल्या नौदल ध्वजावर छत्रपती शिवाजीच्या चिन्हाला स्थान दिल्यावर या ध्वजाची ताकद वाढेल, असा निर्धार मी केला,” असे मोदी यांनी म्हटले.