कराड प्रतिनिधी | सुमारे ४०० वर्षांची परंपरा लाभलेली, कराडसह, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आराध्य दैवत असलेली कराड तालुक्यातील काले गावच्या श्री नंदी देवाच्या यात्रेचा रविवारी मुख्य दिवस सांगता सोहळा पार पडला. हलगी, धनगरी ढोलाचा ठेका, तुतारीचा आवाज, श्री नंदीच्या नावानं चांगभलंचा जयघोष करीत, गुलालाच्या उधळणीत पाच दिवस सुरू असलेल्या यात्रेची रविवारी सांगता झाली. शिवकालीन चित्त थरारक कसरती पाहण्याबरोबर यात्रेमध्ये श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी देखील मोठी गर्दी केली होती.
सकाळपासूनच श्री नंदी देवाच्या दर्शनाला भाविकांनी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती. दुपारी महाआरती होऊन श्री नंदीची बैलगाडीतून मिरवणूक सुरुवात झाली. गुलालाची उधळण व चांगभलंचा अखंड जयघोष चिरमुरे, भुईमुगाच्या शेंगा फुलांची उधळण करीत मिरवणूक मुख्य रस्त्यावरून चावडी चौक मार्गे बाजारपेठ येथे आली. सायंकाळी यात्रेची सांगता झाली. बाजारपेठ येथील महादेव मंदिराच्या पाठीमागील दक्षिण मांड नदीमध्ये भक्तिमय वातावरणामध्ये श्री नंदीचे विसर्जन करण्यात आले.
महाराष्ट्रीयन बेंदुरादिवशी ग्रामदैवत श्री व्यंकनाथ देवाच्या मंदिरामध्ये कुंभार समाजाच्या वतीने नंदी देवाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. नवसाचे तोरण बांधून सुवाद्यांच्या गजरात यात्रेला प्रारंभ झाला. पारंपरिक पद्धतीने व हलगी ठुमक्याच्या आवाजात दानपट्ट्याच्या कसरती यावेळी पाहायला मिळाल्या. पायाखालचा लिंबू फोडणे, डोक्यावर नारळ फोडणे, तलवारबाजी, कुऱ्हाड चालविणे, स्वसंरक्षण दांड पट्टा फिरविणे, कोडी घालणे, कोडी सोडविणे, कैची फिरविणे, कैची चालविणे, समोरासमोर चढाई करणे, हवेत नारळ फोडणे, कांदा लिंबू जिभेखाली ठेवून त्याला दानपट्ट्याच्या तलवारीने तोडणे अशा विविध कसरती यावेळी आबालवृद्धांसह चिमुकल्यांनाही पाहायला मिळाल्या.