सातारा जिल्ह्यातील नायब सुभेदाराला लेहमध्ये वीरमरण; आज होणार अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर (वय- 38) हे जवान शहिद झाले आहेत. लेह येथे सोमवारी दि. 9 रोजी बर्फाळ भागात एका दुर्घटनेत शंकर उकलीकर यांना वीरमरण आले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वसंतगड परिसरात शोककळा पसरली असून शंकर उकलीकर हे सैन्य दलात नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. त्यांचे पार्थिव वसंतगड या गावी आज होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नायब सुभेदार शंकर उकलीकर यांचे शिक्षण वसंतगड येथे जिल्हा परिषद आणि माध्यमिक शिक्षण वि. ग. माने हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात घेतले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत शंकर उकलीकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. सन 2001 साली ते सैन्य दलात भरती झाले होते. सैन्य दलात त्यांनी 22 वर्ष सेवा बजावली होती. त्याच्या पश्चात आई, भाऊ- भावजय, पत्नी, आर्या ही 6 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, आज नायब सुभेदार शंकर उकलीकर यांचे पार्थिव आज वसंतगड येथे आणले जाणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी ग्रमस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

हिमस्खलन होऊन भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार शंकर उकलीकर यांना वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना लडाखमधील माउंट कुनजवळ घडली आहे. या हिमस्खलनात भारतीय सैन्य दलातील तीन जवान बेपत्ता असल्याची माहितीही सैन्य दलातील ( Indian Army ) अधिकाऱ्याने सोमवारी दिली.

प्रशिक्षण सुरु असताना घडली घटना…

माउंट कुनजवळील परिसरात भारतीय सैन्य दलातील हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (HAWS) आणि आर्मी अ‍ॅडव्हेंचर विंगमधील 40 जवानांचं प्रशिक्षण सुरू होतं. सैन्य दलातील या जवानांना पर्वतारोहण प्रशिक्षण देण्यात येत असताना अचानक हिमस्खलन झालं. या हिमस्खलनात भारतीय सैन्य दलातील सैनिक अडकले होते. यातील नायब सुभेदार शंकर उकलिकर हे शहीद झाले.

हिमस्खलनात अडकले जवान :

लडाखमधील माउंट कुन परिसरात 8 ऑक्टोबरला भारतीय सैन्य दलातील तुकडीचं ‘ट्रेन द ट्रेनर’ या मोहिमेनुसार प्रशिक्षण सुरु होतं. या प्रशिक्षणादरम्यान अचानक हिमस्खलन झालं. या हिमस्खलनात भारतीय सैन्य दलातील चार जवान अडकले. त्यामुळे तत्काळ या जवानांना बचावासाठी मोहीम राबवण्यात आली. मात्र, या बचावात एका भारतीय सैन्य दलातील जवानाचं पार्थिव घटनास्थळावर मिळून आलं.

खराब हवामान आणि प्रचंड बर्फवृष्टी :

लेह लडाख सीमा परिसरात सध्या भारतीय जवानांना खराब हवामानाचा आणि प्रचंड बर्फवृष्टीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भारतीय सैन्य दलातील जवानांना कर्तव्य निभावताना अनेक अडचणी येत आहेत. अशा स्थितीत बर्फात अडकलेल्या जवानांना शोधणं खूप अवघड काम आहे. मात्र हे कठीण काम भारतीय सैन्य दलाकडून सुरूच असल्याचं सैन्य दलातील या अधिकाऱ्यानं यावेळी स्पष्ट केलं.