सातारा प्रतिनिधी । थोर समाजसेवक पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांचा 12 वा स्मृतिदिन क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे साजरा करण्यात आला. यावेळी “स्वर्गीय नागनाथ अण्णा हे 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्वपूर्ण स्वातंत्र्य सेनानी होते. प्रति सरकारच्या काळातील क्रांतिकारक, तसेच शाहू, फुले, डॉ. आंबेडकर यांच्या कृतीशील विचाराची वारसदार होते. अण्णा हे धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त व पाणी चळवळीचे आधारस्तंभ होते,” असे प्रतिपादन कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केले.
माण तालुक्यातील म्हसवड येथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेत नागनाथ अण्णां यांचा 12 वा स्मृतिदिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, मुख्याध्यापक अनिल माने व पूनम जाधव तसेच संकुलातील शिक्षक, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागनाथ अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शेतकरी कष्टकरी जनतेसाठी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी प्रचंड काम उभे केले. शिक्षण व सहकारामध्ये वाळवा पॅटर्नची निर्मिती केली. वंचित व बहुजन समाजासाठी अण्णांचे कार्य उल्लेखनीय आहे. अण्णांच्या नावे म्हसवड येथे क्रांतिवीर शैक्षणिक संकुल उभे केले असून त्यामध्ये 2 हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करीत असल्याने त्याचा मला रास्तअभिमान आहे. संकुलाच्या माध्यमातून क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या विचाराचा वसा आणि वारसा जपण्याचे काम सुरू असल्याचे प्रा. बाबर यांनी सांगितले.
यावेळी शाळेतील शौर्य माने, तुषार घुटुकडे, सौम्या पोळ, तनिष्क विरकर, अजिंक्य राऊत, सृष्टी सावंत या विद्यार्थ्यांनी क्रांतिवीर अण्णांच्या जीवन कार्याबाबतचे मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शौर्या सरतापे व संस्कृती माने या विद्यार्थ्यांनी केले तर उपस्थितांचे आभार सृष्टी लुबाळ हिने व्यक्त केले.