सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अलिकडच्या काळात सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर “राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025” या शिर्षकाखाली एक पानाचे विवरण व्हायरल झाले आहे. या खोट्या जाहिरातीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशा प्रकारची कोणतीही कंत्राटी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर प्रसारित होणारी ही माहिती पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सातारा जिल्ह्यात सोशल मीडियावर “राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025” या शिर्षकाखाली एक पानाचे विवरण व्हायरल झाले. त्यानंतर अनेक नागरिक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. आणि व्हायरल झालेल्या कंत्राटी भरतीच्या जाहिरातीबाबत माहिती मागितली. सोशल मीडियात खोट्या स्वरूपाची जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा हा प्रकार निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या लक्षात आला.
त्यानंतर त्यांनी नागरिकांना या खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये आणि त्यानुसार कोणतीही कार्यवाही करू नये, अशी माहिती दिली. तसेच अशा फसव्या जाहिरातींमुळे नागरिकांची आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान होऊ शकते, याची नोंद घ्यावी, असे देखील निवासी जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.