सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात मागील चार महिन्यांत राज्यभरातील सुमारे अडीच लाख शिवप्रेमींनी ऐतिहासिक वाघनखं पाहिली. या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान वधावेळी वापरलेली ऐतिहासिक वाघनखे, शिवकालीन शस्त्रे व अन्य वस्तूंचा इतिहासही जाणून घेतला.
साताऱ्यातील बसस्थानकाशेजारी असलेल्या हजेरी माळावर संग्रहालयाची नूतन इमारत उभी राहिली आहे. याच इमारतीत लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधील ऐतिहासिक वाघनखे पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहेत. राज्य शासनाने लंडन येथील म्युझियमशी तीन वर्षांचा करार केला असून, वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात राहणार आहे. ही वाघनखे भारतात दाखल झाल्यानंतर ती सर्वप्रथम छत्रपतींच्या स्वराज्याच्या राजधानीचा मान मिळालेल्या सातारा शहरात आणण्यात आली. १९ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करून संग्रहालय शिवप्रेमींसाठी खुले झाले.
संग्रहालयात वाघनखांसह साताऱ्याचे तख्त, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा, भाले, तलवारी, कट्यार, चिलखत, बुंदुका, चांदी व सोन्याच्या मुद्रा आदी वस्तू पाहण्यासाठी मांडल्या आहेत. शस्त्र प्रदर्शन सुरु झाल्यापासून शालेय विद्यार्थ्यांसह राज्यभरातील नागरिक या संग्रहालयाला भेटी देत आहेत. गेल्या चार महिन्यांत सुमारे अडीच लाख नागरिकांनी संग्रहालयास भेट दिली असून येथील वाघनखे व शस्त्रास्त्रांचा इतिहास जाणून घेतला.