एकीव धबधब्याच्या कड्यावरून पडलेल्या ‘त्या’ दोन तरुणांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील एकीव येथील धबधब्याजवळील ७०० फूट कड्यावरून खाली पडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात होता. तपासादरम्यान या तरुणांचा धबधब्यात पडून नाही तर त्यांना ढकलून देत त्यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावेळी वादावादी झाल्यानंतर अनोळखी दोन पर्यटकांनी दोघा तरुणांना दरीत ढकलून दिले. हा प्रकार प्रत्यक्षदर्शीने पाहिल्यानंतर पोलिसांनी मेढा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील एकीव धबधब्यावर रविवारी दुपारी पर्यटनासाठी सातारा शहर परिसरातील गावातील काही युवक गेले होते. यामध्ये पंकज शिंदे, समाधान मोरे (रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) आणि अक्षय अंबवले, गणेश फडतरे हे चाैघेही एकत्र धबधबा पाहण्यासाठी गेले होते. साधारणतः सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंकज शिंदे आणि समाधान मोरे हे दुचाकीवरून पुढे निघाले. यावेळी त्यांना जाताना पाहताच त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून अक्षय अंबवले आणि गणेश फडतरे या दोघांनी पाहिले.

खूप वेळ झाला तरी ते दोघे अद्याप आले नाहीत म्हणून पंकज शिंदे हा दुचाकीवरून परत त्यांना पाहण्यासाठी आला. त्यावेळी दोन तरुण अक्षयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. तर त्यांच्यासोबत असलेली इतर मुले रस्त्यावर उभी होती. गणेश फडतरे हा भांडणे सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही ती मुले मारहाण करू लागली. त्यानंतर त्या दोन मुलांनी अक्षय आणि गणेशला 700 फूट खोल दरीत ढकलून दिले. पंकज शिंदे व त्याचा मित्र समाधान तेथे येताच सर्व मुले तेथून पळून गेली.

या प्रकारानंतर पंकजने मेढा पोलिसांना याची माहिती दिली. मेढा पोलिस आणि प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स असोसिएशनच्या मेंबरसनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. रात्रीचा अंधारासोबत मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे दरीत उतरणे अत्यंत धोकादायक होते. अशा अवस्थेतही ट्रेकर्स असोसिएशनच्या मेंबरसनी दरीत उतरून अक्षय शामराव अंबवले (वय 28, रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) याला प्रथम बाहेर काढले. त्यानंतर गणेश अंकुश फडतरे (वय 34, रा. करंजे पेठ, सातारा) याचा मृतदेह दरीतून वर काढला. या दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर या घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली.