कराड प्रतिनिधी । अल्पसंख्यांक मुस्लिम समाजास संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी कराड येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या समतापर्व संयोजन समितीच्या उपोषणस्थळी हजारो मुस्लिम समाज बांधवांनी भेट देत पाठींबा दर्शवला. तसेच प्रशासनास निवेदन देखील दिले. राज्य सरकारने अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षक कायदा व मुस्लिम समाजास ऍट्रॉसिटी सारख्या कायद्याचे संरक्षण मुस्लिम बांधवांना द्यावे, अशी मागणी करत उपोषणकर्ते जावेद नायकवडी, नवाज सुतार, आनंदराव लादे यांनी उपोषण सुरू केले आहे. उद्यापासून पाणी त्याग करत असल्याचा इशारा उपोषणकर्ते जावेद नायकवडी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना केला. तसेच आज उपोषणस्थळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर भेट देणार असल्याची माहिती आनंदराव लादे यांनी दिली.
कराड येथील प्रशासकीय कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या उपोषणास आता वाढता पाठींबा मिळत आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत उपोषण कर्त्याची भेट घेतली. त्यांच्यानंतर रात्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी देखील उपोषण स्थळी भेट देत त्यांच्याशी चर्चा केली.
पालकमंत्र्यांचे उपोषणाकडे दुर्लक्ष….
गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या उपोषणाबाबत प्रशासनाकडून व पालकमंत्र्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने उपोषणकर्ते आक्रमक झाले आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दोन दिवसात उपोषणस्थळी भेट देत मागण्यांबाबत चर्चा केली नाही तर आंदोलन अजून तीव्र करू असा इशारा उपोषण कर्त्यानी दिला आहे.
प्रकाश आंबेडकर देणार उपोषणस्थळी भेट
कराड येथे अल्पसंख्याक मुस्लिम समजास संरक्षण कायदा लागू व्हावा, यासह विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज सातारा येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज दुपारी १ वाजता गांधी मैदान येथे जाहीर सभा संपन्न होणार आहे. या सभेनंतर ते कराड येथील उपोषण स्थळी भेट देतील अशी माहिती आनंदराव लादे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.