कराड प्रतिनिधी । यावर्षी आषाढी एकादशी आणि मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण गुरुवारी (दि.29) रोजी एकाच दिवशी आला आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधव कुर्बानी देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशात आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील मुस्लिम समाज बांधवांनी घेतला आहे.
लोणंद पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीस मुस्लिम समाजाचे विश्वस्त महंमद कच्छी, जब्बार पटेल, कय्युम मुल्ला, कायदेशीर सल्लागार ॲड. बबलू मणेर, नगरसेवक गणी कच्छी, जाविद पटेल, असगर इनामदार, महंमद मुल्ला, राहिदसय्यद, अशरफ इनामदार, इरफान पटेल आदी समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी मुस्लिम समाजाचे विश्वस्त व समाज बांधवांच्या बैठकीमध्ये बकरी ईद दिवशी धार्मिक प्रार्थना म्हणजेच ईद ची नमाज अदा केली जाईल. कुर्बानीचा कार्यक्रम हा आषाढी एकादशीच्या दिवशी न करता धार्मिक परंपरेत सांगितल्याप्रमाणे पुढच्या दोन दिवसात केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. आषाढी एकादशी हा वारकऱ्यांचा मोठा उत्सव असतो. यंदा याच दिवशी बकरी ईदचा देखील सण आलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणंद शहरात मुक्कामी असतो.
पालखी सोहळा या ठिकाणी विसावल्यानंतर लोणंद येथील मुस्लिम बांधव सामाजिक बांधिलकी जपत वारकरी बांधवांची सेवा करतात आणि धार्मिक सलोखा जोपासतात. त्यामुळे एकमेकांच्या परंपरांचा आदर करण्यासाठी बकरी ईदच्या दिवशी धार्मिक महत्त्व असलेला कुर्बानीचा कार्यक्रम पुढच्या दोन दिवसात करण्यात येईल, असा निर्णय लोणंद मुस्लिम जमातीचे विश्वस्त व समाज बांधवांनी घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे.