कराड प्रतिनिधी | सुनेला पळवून नेल्याच्या रागातून विवाहितेच्या सासऱ्याने तरूणाच्या वडिलांची चाकूने वार करून हत्या करून आई आणि भावावर खुनी हल्ला चढवल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. १४) रात्री कराड तालुक्यातील सैदापूर गावात घडली आहे. बाबा मदने (रा. तडवळे, ता. खटाव, जि. सातारा), असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित विजय धर्मा जाधव ( रा. सैदापूर, ता. कराड) याला कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे.
चाकूने वार करून मुलाच्या वडिलांचा खून
कराड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैदापूर (ता. कराड) येथील संतोष देसाई यांच्या अंबक वस्तीवर गुऱ्हाळ आहे. त्यांच्या गुऱ्हाळावर बाबा मदने, त्यांची पत्नी इंदू आणि मुलगा अक्षय, अजित हे ऊसतोड कामगार आहेत. बुधवारी (दि. 13) रात्री ९ च्या सुमारास संशयित विजय धर्मा जाधव हा मोटरसायकलवरून मदने यांच्या घरी आला. आपली सून सपनाला अक्षयने पळवून नेले आहे. तुम्हाला लय मस्ती आली आहे. आता तुम्हाला कोणालाच जिवंत सोडणार नाही. संपवून टाकतो, असे म्हणून खिशातील चाकू काढून त्याने बाबा मदने यांच्या छातीवर तीन वार करून तसेच चाकू भोकसून त्यांची हत्या केली.
आई आणि मुलाच्याही खुनाचा प्रयत्न
बाबा मदने यांची हत्या केल्यानंतर संशयिताने इंदू मदने यांच्या पोटात व डोक्यात तसेच मुलगा बाबा मदने याच्या हातावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, श्रीसुंदर,
सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, उपनिरीक्षक शेख, डिसले हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयिताला तात्काळ ताब्यात घेतले . बाबा मदने (वय २२) याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशमित विजय दर्मा जाधव याला अटक केली. पोलीस निरीक्षक श्रीसुंदर या गुन्ह्याचा तपास करत आहेत.