सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील विद्युत खांबांवर विनापरवाना फ्लेक्स लावण्याच्या प्रकरणात सातारा पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत शाहूनगर, विलासपूर आणि गोडोली येथील रस्त्यालगतच्या विद्युतखांबांवरील दीडशे फ्लेक्स जप्त करण्यात आले आहेत. संबंधितांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातारा येथील देवकर क्लासेस अँड अॅकॅडमी (कामाठीपुरा), श्रीकांत उर्फ अविनाश पवार (रा. पंताचा गोट, सातारा), गायडन्स पॉइंट कोचिंग क्लासेस (पोवई नाका) आणि दिशा अॅकॅडमी (पोवई नाका) यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पालिकेचे अधिकारी प्रशांत निकम यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. ही कारवाई सातारा पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने केली असून, शहरातील विद्रुपीकरण रोखण्यासाठी अशा कारवाया सुरू राहणार आहेत.