सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील मुनावळे येथे जलपर्यटन प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात द्विपक्षीय सामंजस्य करार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातून कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय परिसरात पर्यटन वाढीला चालना देणारा अभिनव प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात संबंधित विभागांची बैठक घेऊन सामंजस्य कराराची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने निर्देश दिले.
कोयना धरणापासून उत्तरेस सुमारे ४० कि.मी. अंतरावर शिवसागर जलाशयाच्या तीरावर मौजे मुनावळे (ता. जावळी) येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत जागतिक दर्जाचा नाविन्यपूर्ण जलपर्यटन प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये जागेची पाहणी करून सदर प्रकल्पाबाबत सूचना दिल्या होत्या. या प्रकल्पाकरिता महसूल आणि जलसंपदा विभागाकडे असणारी जमीन हस्तांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. गुरुवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत सदर प्रकल्पाबाबतचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी प्रकल्पाकरिता सामंजस्य करार पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिली. त्यानुसार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी मंत्रालयात कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सामंजस्य कराराची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याबाबत निर्देश दिले. या बैठकीस पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, दूरदृश्य प्रणालीद्वारे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.
सदर कराराच्या मसुद्यास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता दिली असून लवकरच सामंजस्य करार होऊन मुनावळे येथे जलपर्यटन प्रकल्प कार्यान्वित होईल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.
सदर प्रकल्पास ४५.३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यामुळे पर्यटन वाढ होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यात पर्यटकांसाठी बोट क्लब, हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग, जेट स्की यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. जलपर्यटन आणि जलक्रीडा यांचा समावेश असलेला आणि नदी जलाशयावर होणारा अशाप्रकारचा हा पहिला प्रकल्प ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे कायम आग्रही आहेत.
त्या दृष्टीने येथील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी मुनावळे येथे जलपर्यटन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सामंजस्य करार पूर्ण करून लवकरच या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहोत, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.