सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर – पाचगणी मुख्य मार्गावर मॅप्रो गार्डन समोर आराम बसने मागून धडक दिली. मुंबई येथील पर्यटक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. नीरज अरुण मेहता असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आराम बस चालकाविरुद्ध पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी मौजे गुरेघर (ता. महाबळेश्वर) गावच्या हद्दीतील मॅप्रो गार्डनच्या पार्किंग गेट नंबर एक समोर नीरज अरुण मेहता (वय ४६, वर्षे रा. घाटकोपर ईस्ट मुंबई) पाठीमागून येणाऱ्या गाडीस रस्ता दाखवण्यासाठी थांबले होता. यावेळी त्याला गेट नंबर एकच्या पार्किंगमधून आराम बसचालक दिगंबर कृष्णा नाईक (वय ४३, रा. अकोला, राज्य कर्नाटक, टेंकनकेरी ) याने त्याच्या ताब्यातील आराम बस (क्रमांक केए-२१ए -८४६ ने धडक दिली.
पाचगणी – महाबळेश्वर रस्त्यावर हा अपघात झाला. यामध्ये नीरज मेहता हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात पराग महेश शहा (वय ४१ रा. ५०३/५०५ भावेश्वर दर्शन, आनंद जी लेन घाटकोपर ईस्ट, मुंबई यांनी फिर्याद दिली आहे. पाचगणी पोलिसांनी गाडीचा चालक दिगंबर कृष्णा नाईक याच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या घटनेचा पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माने अधिक तपास करीत आहेत.