मुंबई-कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ लवकरच; आज एक्स्प्रेसची ट्रायल रन पार पडणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मुंबई – कोल्हापूर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मिरज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांना मुंबई येथे झालेल्या भेटीदरम्यान दिली. त्यामुळे मिरज आणि कोल्हापूर फास्ट ट्रॅकवर येणार आहे. दरम्यान, आज (शनिवारी) मिरज-पुणे-मिरज वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन पार पडणार आहे.

दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे अशी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ही एक्स्प्रेस तीन दिवस हुबळी-मिरज-कोल्हापूर-मिरज-पुणे अशी धावणार होती. परंतु हा मार्ग अत्यंत गैरसोयीचा असल्यामुळे आठवड्यातून तीन दिवस हुबळी-मिरज-पुणे आणि उर्वरित तीन दिवस कोल्हापूर-मिरज-पुणे अशी वंदे भारत एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे.

यासाठी हुबळी ते मिरजपर्यंतची वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रनदेखील पार पडली आहे. ही ट्रायल रन यशस्वी झाली असून, शनिवारी मिरज-पुणे-मिरज वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 16 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून ती एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे.

तसेच मुंबई – कोल्हापूर-मुंबई स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस सोडण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यासाठी मिरज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी मुंबईत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबई -मिरज-कोल्हापूर नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली. याला प्रतिसाद देत त्यांनी तातडीने नवीन वंदे भारत एक्स्प्रेस देण्याचे मान्य केले. त्यामुळे लवकरच मुंबई-मिरज-कोल्हापूर वंदे भारत सुरू होण्याची शक्यता आहे. मिरजमार्गे दोन वंदे भारत धावणार असल्याने मिरज फास्ट ट्रॅकवर आले आहे.

दरम्यान, मुंबई -कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास कोल्हापूर -मिरज-पुणे आठवड्यातून तीन दिवस धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस रद्द होऊ शकते आणि आठवड्यातील सहा दिवस ही एक्स्प्रेस हुबळी-मिरज-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस म्हणून धावू शकते. त्यामुळे मिरजमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.